Friday, April 19, 2019

राज्य लोकसभा निवडणूक लढविणार्‍या उमेद्वारांपैकी 17 टक्के उमेद्वार गुन्हेगार


एप्रिल 2019 मध्ये देशातील सतरावी लोकसभा निवडणूक होत आहे. राज्यातील लोकसभा निवडणूक-2019 मधील पहिला टप्प्यातील मतदानासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 17 टक्के उमेद्वारांविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे दाखल झालेली आहेत. 115 अर्जापैकी 19 अर्ज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेद्वारांचे आहेत. त्याचप्रमाणे उमेद्वारांची आर्थिक परिस्थिती पाहता 29 टक्के उमेद्वार कोट्यधिश असून 49 टक्के उमेद्वार पदव्युत्तर नाहीत. तेव्हा राज्य लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील उमेद्वारांचे गुन्हेगारी, आर्थिक, शैक्षणिक, लिंग आणि इतर पार्श्वभूमीचे विश्लेषण करणारा हा लेख...

 महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी 11 एप्रिल 2019 रोजी होणार्‍या महाराष्ट्र लोकसभा निवडणुक-2019 मधील पहिल्या टप्प्यातील 116 उमेद्वारांपैकी 115 उमेद्वारांच्या शपथपत्राचे विश्लेषण केले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी
गुन्हेगारी प्रकरणे असलेले उमेद्वार विश्लेषित केलेल्या 115 पैकी 19 म्हणजेच 17 टक्के उमेद्वारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे घोषित केले आहे. गंभीर गुन्हेगारी प्रकरणं असलेले उमेद्वार  विश्लेषित केलेल्या 115 पैकी 10 म्हणजेच 9 टक्के उमेद्वारांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. 
गुन्हेगारी प्रकरणे दाखल असलेले पक्षवार उमेद्वार वंचित बहुजन आघाडीने विश्लेषित केलेल्या 7 उमेद्वारांपैकी 2 उमेद्वार म्हणजेच 29 टक्के उमेद्वार ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस‘च्या विश्लेषित केलेल्या 6 उमेद्वारांपैकी 2 म्हणजेच 33 टक्के उमेद्वार ‘भारतीय जनता पक्षा‘च्या विश्लेषित केलेल्या 5 उमेद्वारांपैकी 2 म्हणजेच 40 टक्के आणि ‘शिवसेने‘च्या विश्लेषित केलेल्या 2 उमेद्वारांपैकी 1 म्हणजेच 50 टक्के उमेद्वारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणं दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. 

अति संवेदनशील मतदारसंघ
एकूण 7 पैकी 5 मतदारसंघ अति संवेदनशील मतदारसंघ आहेत. रेड अलर्ट मतदारसंघ अशा आहेत जिथे 3 किंवा त्याहून अधिक उमेद्वारांनी स्वत:च्या विरोधात गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत.

आर्थिक  पार्श्वभूमी
 कोट्यधीश उमेदवार विश्लेषित केलेल्या 115 पैकी 33 (29 टक्के) उमेद्वार कोट्यधीश आहेत. 
पक्षवार कोट्यधीश उमेद्वार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विश्लेषित केलेल्या 6 पैकी 6 (100 टक्के), भारतीय जनता पक्षाच्या विश्लेषित केलेल्या 5 पैकी 5 (100 टक्के), वंचित बहुजन आघाडीच्या 7 पैकी 4 (57 टक्के), बहुजन समाज पक्षाच्या 6 पैकी 3 (50 टक्के), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1 पैकी 1 (100 टक्के) आणि शिवसेनेच्या विश्लेषित केलेल्या 2 पैकी 2 (100 टक्के) उमेद्वार कोट्यधीश आहेत.
सरासरी मालमत्ता महाराष्ट्र लोकसभा निवडणूक - 2019 च्या पहिल्या टप्प्यात भाग घेणार्‍या उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 2.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
पक्षवार सरासरी मालसत्ता  मोठया पक्षांपैकी 7 वंचित बहुजन आघाडीच्या उमेद्वारांसाठी प्रति उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 2.76 कोटी रुपये, 6 भारतीय राष्ट्रीय पक्षाच्या उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 6.97 कोटी रुपये, 6 बहुजन समाज पक्षाच्या उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 3.13 कोटी रुपये, 5 भारतीय जनता पक्षाच्या उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 18.99 कोटी रुपये आणि 2 शिवसेनेच्या उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 9.62 कोटी रुपये आहे.

सरासरी देणी आणि कर्ज
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक -2019 च्या पहिल्या टप्प्यात भाग घेणार्‍या उमेद्वारांची सरासरी देणी अथवा त्यांच्यावरील कर्जाची रक्कम 20.87 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

पक्षावार सरासरी देणी
मोठया पक्षांपैकी भारतीय जनता पक्षाच्या 5 उमेद्वारांसाठी प्रति उमेद्वारांची सरासरी देणी 1.70 कोटी रुपये, वंचित बहुजन आघाडीच्या 7 उमेद्वारांची सरासरी देणी 1.04 कोटी रुपये,  शिवसेनेच्या 2 उमेद्वारांची सरासरी देणी 58 लाख रुपये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 6 उमेद्वारांची सरासरी देणी 46 लाख रुपये आणि बहुजन समाज पक्षाच्या 6 उमेद्वारांची सरासरी देणी 9.55 लाख रुपये आहेत.

पॅन घोषित न केलेले उमेद्वार
एकूण 10 (9 टक्के) उमेद्वारांनी त्यांचे पॅन कार्ड घोषित केले नाहीत. उत्पन्नाचे स्त्रोत घोषित न केलेले उमेद्वारांमध्ये 115 विश्लेषित उमेद्वारांपैकी एकूण 11 (10 टक्के) उमेद्वारांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत घोषित केलेले नाहीत.

आयकर घोषित न केलेले उमेदवार
एकूण 48 (42 टक्के) उमेद्वारांनी त्यांचे आयकर विवरण जाहीर केले नाही. काही उमेद्वारांना आयकर भरावा लागत नाही.
आयटीआर मध्ये जाहीर केल्याप्रमाणे उच्च उत्पन्न असलेले उमेद्वार 115 विश्लेषित उमेद्वारांपैकी केवळ 5 (4 टक्के) उमेद्वारांनी  त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 50 लाखाहून अधिक असल्याचे घोषित केले आहे.

वि.खासदारांच्या मालमत्तेचे तुलनात्मक विश्लेषण
निवडणूक लढणार्‍या विद्यमान खासदारांची संख्या 6 इतकी आहे. विद्यमान खासदारांची 2014 मध्ये सरासरी मालमता 5.37 कोटी रुपये इतकी होती. तर, विद्यमान खासदारांची 2019 मध्ये सरासरी मालमता8.57 कोटी रुपये इतकी आहे. सन 2014 ते 2019 या कालावधीत विद्यमान खासदारांच्या मालमत्तेमध्ये सरासरी वाढ 3.20 कोटी रुपयांनी म्हणजेच 60 टक्के इतकी वाढ झाली आहे.

उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी
56 (49 टक्के) उमेद्वारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 5 वी ते 12 वी दरम्यान असल्याचे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे 52 (45 टक्के) उमेद्वारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता पदवी ते डॉक्टरेट पर्यंत असल्याचे घोषित केले आहे, तर 5 (4 टक्के) उमेद्वारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता अन्य घोषित केले आहे तसेच 2 (2 टक्के) उमद्वार साक्षर आहेत.

उमेद्वारांच्या वयाची माहिती
सन 2019 च्या राज्य लोकसभा निवडणुकीमध्ये 23 (20 टक्के) उमेद्वारांनी त्यांचे वय 25 ते 40 वर्षे दरम्यान घोषित केलेले आहे. तर, 68 (59 टक्के) उमेद्वारांनी त्यांचे वय 41 ते 60 वर्षे दरम्यान घोषित केलेले आहे. त्याचप्रमाणे 23 (20 टक्के) उमेद्वारांनी त्यांचे वय 61 ते 80 वर्षे दरम्यान घोषित केलेले आहे. तर 1 (1 टक्के) उमेद्वाराने त्याचे वय 80 पेक्षा जास्त असल्याचे घोषित केले आहे.

उमेद्वारांची लिंग विषयक माहिती
11 (10 टक्के) महिला उमेद्वार महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात लढत आहे.

तृप्ती कानडे - शुक्ल


मालेगाव मतदारसंघात अद्यापपर्यंत सर्वाधिक मतदान
‘नाशिक‘मध्ये पक्षास प्राधान्य तर, ‘मालेगाव‘मध्ये उमेद्वारास प्राधान्य

मतदानाची टक्केवारी पाहता मालेगाव मतदारसंघ मतदान हक्क बजावण्यास सक्रीय आहे, तर तुलनेने नाशिक मतदार संघात मतदानाविषयी उदासिनता दिसून आलेली आहे. जरी नाशिक मतदार संघात सर्वाधिक 9 लाखाहून अधिक मतदान झाले असले तरी मतदारांच्या तुलनेत मतदानाची संख्या कमी असल्याने टक्केवारी कमी आहे.

1951 पासून आजतागायत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकां मधील मतदानाची टक्केवारी पाहता तुलनात्मकदृष्ट्या जिल्ह्यातील मालेगाव मतदार संघात मतदानाची टक्केवारी अधिक राहिली आहे. पार पडलेल्या 17 निवडणुकांपैकी 5 निवडणुकांमध्ये 62 टक्के प्लस मतदान झाले आहे. तर नाशिक लोकसभा मतदार संघात मतदानाबाबत तुलनेने निष्क्रियता दिसते. या संघात 17 लोकसभा निवडणुकांपैकी केवळ एकच वेळा 60 टक्के प्लस मतदान झाले आहे.

दोन्ही मतदार संघातील मतदानाची आकडेवारी पाहता सर्वाधिक मतदान नाशिक मतदार संघात झाले आहे. मात्र एकूण मतदार संख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या कमी असल्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघात कमी मतदान झाल्याचा निष्कर्ष योग्य ठरतो.

नाशिक लोकसभा मतदार संघात 1967 साली आजपर्यंत सर्वाधिक म्हणजेच 65.79 टक्के मतदान झाले. त्याखालोखाल 2014 मध्ये 58.83 टक्के, 1999 मध्ये 57.88 टक्के, 1971 मध्ये 57.35 टक्के,  1984 मध्ये 56.51 टक्के, 1989 मध्ये 54.84 टक्के, 1877 मध्ये 54.70 टक्के, 1962 मध्ये 54.18 टक्के, 1980 मध्ये 53.42 टक्के, 1951 मध्ये 53.17 टक्के, 1998 मध्ये 51.65 टक्के, 1991 मध्ये 50.72 अशा प्रकारे मतदान झाले.  1967 च्या चौथ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदार संघात सर्वाधिक (65.79 टक्के) मतदान झाले यावेळी नाशिक मतदार संघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे भानुदास कवडे निवडून आले.

नाशिक मतदार संघातून ज्या ज्या वेळी 50 टक्के हून अधिक मतदान झाले, त्या त्या वेळी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व आहे. तर, ज्या वेळी 55 टक्के किंवा त्याहून अधिक मतदारांनी मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यावेळी इतर पक्ष निवडून आल्याचे दिसते. 2014 मध्ये बीजेपी चे हेमंत गोडसे, 1989 मध्ये बीजेपी चे दौलत आहेर, 1999 मध्ये शिवसेनचे उत्तमराव ढिकले आणि 1977 मध्ये बीएलडी पक्षाचे विठ्ठलराव हांडे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व पाहिले.

त्याचप्रमाणे तत्कालिन मालेगाव मतदार संघ आणि 2009 नंतर झालेला दिंडोरी मतदार संघात आजपर्यंत जिल्ह्यातील सर्वाधिक टक्के मतदान झाल्याचे चित्र दिसते. 1962 मध्ये मालेगाव मतदार संघात 66.76 टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले. त्याखालोखाल 1999 मध्ये 64.50 टक्के, 2014 मध्ये 63.41 टक्के, 1957 मध्ये 63.40 टक्के, 1967 मध्ये 62.59 टक्के, 1984 मध्ये 55.93 टक्के, 1971 मध्ये 55.89 टक्के, 1989 मध्ये 52.02 टक्के आणि 1977 मध्ये 51.74 टक्के मतदान झाले. मालेगाव लोकसभा मतदार संघात ज्यावेळी सर्वाधिक (66.76 टक्के) टक्के मतदान झाले त्या वेळी (1962 साली) संघात भारतीय राष्टीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व राहिले.

मालेगाव मतदार संघातून ज्या ज्या वेळी 55 ते 62 टक्के दरम्यान  मतदान झाले आहे त्या त्या वेळी मालेगाव मतदार संघात काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व दिसते. एवढा एकच निष्कर्ष काढता येतो. अन्यथा मालेगाव मतदार संघात कोणत्याही एकाच पक्षाचे नेतृत्त्व दिसत नाही. थोडक्यात मालेगाव मतदार संघ पक्ष पाहून नव्हे तर उमेद्वार पाहून मतदान करण्यास प्राधान्य देतो, असे म्हणणे योग्य ठरते. याशिवाय झामरु मंगळु कहांडोळे यांनी मालेगाव मतदार संघातून तब्बल 8 वेळा भारतीय काँग्रेस पक्षाची उमेद्वारी करीत निवडणूक जिंकून तब्बल 5 वेळा काँग्रेसचे नेतृत्त्व केले आहे.

सर्वाधिक टक्के मतदान ते सर्वात कमी मतदान याप्रमाणे आलेख पाहता मालेगाव मतदार संघात जनतादल, बीजेपी, पीएसपी, काँग्रेस या पक्षांच्या उमेद्वारांनी नेतृत्त्व केले आहे. त्याप्रमाणे 1999 मध्ये जनतादलाचे हरीभाऊ महाले, 2014 मध्ये भाजप चे हरिश्चंद्र चव्हाण, 1957 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे यादव नारायण जाधव, 1989 व 1977 मध्ये जनतादलाचे हरीभाऊ महाले, तसेच 1967, 1984,1971 मध्ये काँग्रेसच्या अनुक्रमे झामरु कहांडोळे, सिताराम भोये, झामरु कहांडोळे या नेत्यांनी संघाचे नेतृत्त्व केले आहे.

तृप्ती कानडे - शुक्ल
एडीआर अहवालानुसार राज्यात 21 टक्के उमेद्वार गुन्हेगार, 25 टक्के कोट्यधीश, 3 टक्के उच्चशिक्षित



महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार दुसर्‍या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांपैकी 21 टक्के उमेदवार गुन्हेगार असून 13 टक्के उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे. त्याचप्रमाणे केवळ 3 टक्के उमेदवार उच्चशिक्षित असून 29 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. अशा प्रकारे उमेदवारांच्या विविध अंगांची माहिती देणारा हा लेख.
दि. 18 एप्रिल 2019 रोजी होणार्‍या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील दुसर्‍या टप्प्यातील 179 उमेदवारांपैकी 178 उमेदवारांच्या शपथपत्राचे विश्लेषण एडीआरने केले आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर या 10 मतदारसंघांतून हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी
गुन्हेगारी प्रकरणे असलेले उमेदवार विश्लेषित केलेल्या 178 पैकी 38 म्हणजेच 21 टक्के उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे घोषित केले आहे. गंभीर गुन्हेगारी प्रकरणे असलेले उमेदवार विश्लेषित केलेल्या 178 पैकी 23 (13 टक्के) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे.

गुन्हेगारी प्रकरणे दाखल असलेले पक्षवार उमेदवार
वंचित बहुजन आघाडीच्या विश्लेषित केलेल्या 9 उमेदवारांपैकी 4 (44 टक्के), बहुजन समाज पक्षाच्या विश्लेषित केलेल्या 7 उमेदवारापैकी 3 (43 टक्के), शिवसेनेच्या विश्लेषित केलेल्या 5 उमेदवारांपैकी 4 (80 टक्के), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विश्लेषित केलेल्या 5 उमेदवारांपैकी 3 (60 टक्के) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्लेषित केलेल्या 4 उमेदवारापैकी 3 (75 टक्के) उमेदवारांनी त्यांच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे.

गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (50 टक्के) आहेत, तर त्याखालोखाल राष्ट्रीय काँग्रेस (40 टक्के), बहुजन समाज पक्ष (29 टक्के), वंचित बहुजन आघाडी (22 टक्के) आणि सर्वांत कमी उमेदवार शिवसेनेचे (20 टक्के) आहेत.

अतिसंवेदनशील मतदारसंघ
10 पैकी 6 मतदारसंघ अतिसंवेदनशील मतदारसंघ आहेत. रेड अलर्ट मतदारसंघ अशा आहेत जेथे 3 किंवा त्याहून अधिक उमेदवारांनी स्वत:च्या विरोधात गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत.

आर्थिक पार्श्वभूमी
कोट्यधीश उमेद्वार विश्लेषित केलेल्या 178 पैकी 45 (25 टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत.
पक्षवार कोट्यधीश उमेदवारांची यादी पाहता सर्वाधिक संपत्ती असलेले उमेद्वार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (100 टक्के) पक्षाचे आहेत. तर, सर्वांत कमी उमेदवार हे बहुजन आघाडीचे (43 टक्के) आहेत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या विश्लेषित केलेल्या 9 पैकी 7 (78 टक्के), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या विश्लेषित केलेल्या 5 पैकी 5 (100 टक्के), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 पैकी 4 (100 टक्के) आणि बहुजन समाज पक्षाच्या 7 पैकी 3 (43 टक्के) उमेदवार कोट्याधीश आहेत.

सरासरी मालमत्ता महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसर्‍या टप्प्यात भाग घेणार्‍या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 2.83 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पक्षवार सरासरी मालसत्ता मोठ्या पक्षांपैकी 9 वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रति उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 6.29 कोटी रुपये, 7 बहुजन समाज पक्षाच्या उमेद्वारांची सरासरी मालमत्ता 7.32 कोटी रुपये, 5 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 22.39 कोटी रुपये, 5 भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 12.22 कोटी रुपये, 5 शिवसेनेच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 5.40 कोटी रुपये आणि 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 18.01 कोटी रुपये आहे.

सरासरी देणी अथवा कर्जे
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसर्‍या टप्प्यात भाग घेणार्‍या उमेदवारांची सरासरी देणी, कर्ज 39 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

पक्षवार सरासरी देणी
यामध्ये मोठ्या पक्षांपैकी 5 भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रति उमेदवारांची सरासरी देणी 4.29 कोटी रुपये, 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची सरासरी देणी 3.41 कोटी रुपये, 5 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी देणी 1.62 रुपये, 9 वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची सरासरी देणी 94 लाख रुपये, 5 शिवसेनेच्या उमेदवारांची सरासरी देणी 50 लाख रुपये आणि 7 बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांची सरासरी देणी 15 लाख रुपये आहे.

पॅन घोषित न केलेले उमेदवार
विश्लेषित केलेल्या 178 उमेदवारापैकी एकूण 15 (8 टक्के) उमेदवारांनी त्यांचे पॅन घोषित केले नाहीत. उत्पन्नाचे स्रोत घोषित न केलेले उमेदवार 178 विश्लेषित उमेदवारांपैकी एकूण 18 (10 टक्के उमेदवारांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत घोषित केले नाही.

आयकर घोषित न केलेले
एकूण 113 (63 टक्के) उमेदवारांनी त्यांचे आयकर विवरण जाहीर केले नाही. (काही उमेदवारांना आयकर भरावा लागत नाही)

उच्च उत्पन्न असलेले
आयटीआरमध्ये जाहीर केल्याप्रमाणे 178 विश्लेषित उमेदवारांपैकी केवळ 5 (3 टक्के) उमेदवारांनी त्यांची एकूण वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे घोषित केले आहे.

विद्यमान खासदारांच्या मालमत्तेचे तुलनात्मक विश्लेषण
निवडणूक लढणार्‍या विद्यमान खासदारांची संख्या 5 इतके आहे. विद्यमान खासदारांची 2014 मध्ये सरासरी मालमत्ता 12.40 कोटी रुपये इतकी होती. तर, विद्यमान खासदारांची 2019 मध्ये सरासरी मालमत्ता 16.59 कोटी रुपये इतकी होती. सन 2014 ते 2019 या कालावधीत विद्यमान खासदारांच्या मालमत्तेत 34 टक्क्यांनी सरासरी वाढ झाली असून मालमत्ता 4. 18 कोटी रुपये आहे.

शैक्षणिक आढावा
93 म्हणजेच 52 टक्के उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 5 वी ते 12 वी, 71 40 टक्के उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता पदवी ते डॉक्टरेटपर्यंत घोषित केलेली आहे, तर 6 (3 टक्के) उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता अन्य असल्याचे सांगितले आहे. तर 7 म्हणजेच 4 टक्के उमेदवार साक्षर आहेत आणि 1 (1 टक्का) उमेदवार निरक्षर आहेत.

उमेदवारांच्या वयाचा आढावा
61 (34 टक्के) उमेद्वारांनी त्यांचे वय 25 ते 40 वर्षे दरम्यान घोषित केले आहे, 86 (48 टक्के) उमेदवारांनी त्यांचे वय 41 ते 60 वर्षे दरम्यान घोषित केले आहे, 29 (16 टक्के) उमेदवारांनी त्यांचे वय 61 ते 80 वर्षे दरम्यान घोषित केले आहे, तर 2 (1 टक्का) उमेदवारांनी त्यांचे वय माहीत नसल्याचे घोषित केले आहे.

लिंगवार उमेदवार
10 (6 टक्के) महिला उमेद्वार महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात लढत आहे.

तृप्ती कानडे - शुक्ल
कडक उन्हाळ्यातील आठवी लोकसभा निवडणूक

तीव्र उन्हाच्या तडाख्यातील सतरावी लोकसभा निवडणूक ही सातवी लोकसभा निवडणूक असेल, तर सन 2004 पासून सलग चौथ्या वेळा तीव्र उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक पार पडत आहे. 2004 मध्ये 20 एप्रिल ते 10 मे काळात, 2009 मध्ये 16 एप्रिल ते 13 मे या काळात, 2014 मध्ये 7 एप्रिल ते 12 मे या काळात निवडणुका पार पडल्या. तर यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान लोकसभा निवडणूक पार पडत आहेत.



देशात सतरावी लोकसभा निवडणूक पार पडत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार उष्म्याच्या लाटेची शक्यता आहे. असे झाल्यास सतरावी लोभसभा निवडणूक ही उन्हाच्या तडाख्यात पार पडणारी आठवी लोकसभा निवडणूक ठरेल

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत पार पडल्या, तर यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान मतदान होणार आहे. गेल्या वर्षी गारपीट आणि वादळी पावसानंतर कडक उन्हाच्या तडाख्यात मतदान पार पडले. त्याचप्रमाणेच यंदाही राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व येवला या भागात नुकताच गारपिटीसह वादळी पाऊस झाला आहे. राज्यात बर्‍याचशा ठिकाणी ढगाळ, पावसाळी व गरमीचे वातावरण आहे. हवामान खात्याने उष्म्याची लाट येण्याचा अंदाजही वर्तविला आहे. त्यामुळे यंदाही तीव्र उन्ह्याच्या तडाख्यात लोकसभा निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.

उन्हाळा आणि पाणीटंचाईच्या काळात होऊ घातलेली 17 व्या लोकसभेची निवडणूक ही आठवी आहे. यापूर्वी लोकसभेच्या सात निवडणुका भर उन्हाळ्यात झाल्या आहेत. यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तपमानाने उच्चांक गाठला आहे. मार्चमध्ये सरासरी तपमानाने 40 अंश सेल्सिअस इतका उच्चांक गाठला, तर एप्रिल महिन्यात प्रसंगी तपमानाने चाळीशी पार केली.

पाणीटंचाई पाहता उन्हाळ्यापूर्वीच ग्रामीण भागात गावे व वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती. फेब्रुवारी महिन्यात टँकरने शंभरी गाठली होती. मार्च अखेरपर्यंत टँकरची संख्या पावणे दोनशे झाली तर, एप्रिल महिन्यात टँकरची संख्या द्विशतक पार करीत आहे. उन्हाचा तडाखा बघता एप्रिलमध्ये उन्ह चांगलेच तपणार असल्याची चिन्हे असून त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तीव्र उन्हात झालेल्या निवडणुका
गेल्या काही वर्षांत लोकसभेच्या निवडणुका या भर उन्हाळ्यात झाल्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून येते. 1971 मध्ये पाचव्या लोकसभेसाठी झालेली निवडणूक 1 ते 10 मार्च या काळात झाली. 1977 ची निवडणूक 16 ते 20 मार्च या काळात झाली. 1991 ची सार्वत्रिक निवडणूक भर उन्हाळ्यात म्हणजे 20 मे ते 15 जून या काळात झाली. त्यानंतर 1996 मध्ये झालेल्या निवडणुकाही भर उन्हाळ्यात होत्या. या निवडणुका 27 एप्रिल ते 30 मे या काळात घेण्यात आल्या होत्या. 2004 मध्येही 20 एप्रिल ते 10 मे या काळात निवडणुका घेण्यात आल्या. 2009 मध्ये 16 एप्रिल ते 13 मे या काळात, तर 2014 मध्ये 7 एप्रिल ते 12 मे या काळात तीव्र उन्हाळ्यात निवडणुका पार पडल्या. तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे मतदारांना भर उन्हात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे लागले होते.

जिल्ह्यातील परिस्थिती
सतराव्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 11 एप्रिल ते 19 मेदरम्यान मतदान होणार आहे. देशभरात गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. राज्यात चार टप्प्यांत मतदान होणार असून नाशिक व दिंडोरी मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील मतदानदेखील तीव्र उन्हात पार पडणार आहे.
मार्चमध्ये तपमानाने चाळिशी पार केली असल्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना उकाड्यामळे फिरणे कठीण झाले. त्यातच दोन दिवसांपासून झालेल्या पावसाळी वातावरणामुळे निवडणुकीच्या प्रचारात अडथळे निर्माण होत आहेत. दि. 2 ते 9 एप्रिल काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रियादेखील उन्हाच्या तडाख्यातच पार पडली. उन्हामुळे मतदार मतदानासाठी कसे बाहेर पडतील याची चिंता उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.

उन्हापासून बचावासाठी व्यवस्था
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मतदान केंद्रांवर उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नव्हत्या; मात्र यंदा उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्व मतादान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तंबू ठोकणार आहेत. त्याचप्रमाणे बीपी अ‍ॅबनॉर्मल होणे, भोवळ येणे, दम लागणे आदी उन्हापासून होणार्‍या त्रासापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्रांवर फर्स्ट एड बॉक्स ठेवण्यात आला आहे. त्यात ग्लुकॉन्डी, प्राथमिक चेकअप आदी सुविधा देण्यात येतील. यामुळे मतदारांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर मंडप टाकण्यात आले नव्हते, त्यामुळे दुपारी 12 नंतर मतदान केंद्रांवरचा मतदानाचा ओघ कमी झाला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीतदेखील प्रखर उन्हाळा असताना शहर आणि ग्रामीण भागात तंबू ठोकण्यात आले होते.

तृप्ती कानडे - शुक्ल
अपक्षाला थारा नाहीच, मतदारांकडून भोपळा

नाशिक आणि मालेगाव मतदारसंघातून पहिल्या निवडणुकीपासून अपक्ष उमेद्वार अखंडपणे उभे राहत आले आहेत. कधी बंडखोरीचे राजकारण करीत, तर कधी नाराजी व्यक्त करीत, तर कधी इतर कारणाने उमेद्वार अपक्ष उभा राहण्यास प्रवृत्त झाल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यात अद्याप एकाही अपक्षास सीट मिळालेले नाही. नाशिक व मालेगाव मतदारसंघात अपक्षाला मतदारांनी थारा दिला नाही, तर उलट भोपळाच दाखवला आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघ आणि मालेगाव लोकसभा मतदार संघ यांची तुलना करता मालेगाव मतदार संघात अपक्ष उमेद्वारांचे प्रमाण बरेच कमी (सर्वाधिक 7 टक्के, सर्वात कमी 1 टक्का) असल्याचे स्पष्ट होते. याऊलट नाशिक लोकसभा मतदार संघाने बंडखोरीचे राजकारणाचा इतिहासच रचला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात 1984 ते 1996 या काळात अपक्ष उमेद्वारांनी जणू शृंखलाच विणली. नाशिक मध्ये 1984 साली सर्वाधिक अपक्ष उमेद्वार उभे राहिले. त्याखालोखाल 1996 मध्ये नाशिक मतदार संघात 15 अपक्ष उमेद्वार उभे राहिले. मात्र त्यांस कोणतेही यश मिळाले नाही. मात्र 1998 व 99 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेद्वारांची संख्या 15 वरुन 1 वर येवून पडली. त्यानंतर अपक्ष उमेद्वारांत पुन्हा सातत्याने वाढ झाल्याचे चित्र आहे. नाशिक मतदारसंघातून 2004 मध्ये 3, 2009 मध्ये 5, 2014 मध्ये 6 उमेद्वार अपक्ष उभे राहिले, तर 2018 मध्ये अपक्ष उमेद्वारांची संख्या 10 वर येवून पोहचली आहे. 
मालेगाव मतदार संघात 1971 साली प्रथमच 2 अपक्ष उमेद्वार उभे राहिले. त्यानंतर सर्वाधिक म्हणजेच 7 अपक्ष उमेद्वार 1991 मध्ये रिंगणात उतरले. तर 2009 मध्ये 4, 2014 मध्ये 3 आणि 2018 मध्ये --- उमेद्वार अपक्ष म्हणून उभे राहिले. यावरुन अपक्ष उमेद्वारांनी संख्या मालेगाव संघात जोर करीत आहे.

1984 ची लोकसभा निवडणूक. यावेळी सर्वाधिक निवडणुका जिंकणारा म्हणून ख्याती मिळविलेले झामरु कहांडोळे देखील अपक्ष उभे राहिले होते. सर्वाधिक निवडणुका जिंकलेल्या असूनदेखील या चेहर्‍यास मतदारांनी भोपळाच दाखविला. मालेगाव मतदार संघाने अशी ओळख निर्माण केली आहे की, या संघात मतदार पक्षाऐवजी उमेद्वार पाहूनच मतदान करतात. त्यामुळे मालेगावने विविध पक्षांचे नेतृत्त्व अनुभवले. अपक्ष उमेद्वार यास अपवाद असल्याचे दिसते. मालेगाव संघात मतदारांनी कधीही अपक्षास थारा दिला नाही. त्यामुळेच कहांडोळे यांचा पराभव स्विकारावा लागला.

भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीस निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्वाधिक राजकीय पक्ष अशी ओळख असलेला आपला भारत देश. ज्यामध्ये देशपातळीवर प्रचलित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, जनतादल असे पक्ष आहेत. याशिवाय राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. ज्यापैकी काही प्रचलित आहेत, तर काहींचे फारसे अस्तित्त्व दिसून येत नाही. प्रादेशिक प्रचलित पक्षांमध्ये शिवसेना, मनसे आदींचा समावेश आहे. तर 1951 ते 1962 दरम्यान प्रजा समाजवादी पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांसारखे पक्ष प्रचलित राहिले.

याशिवाय असे अनेक पक्ष उदयास आले आणि मान्यता न मिळाल्याने अथवा आपले अस्तित्त्व निर्माण करु न शकल्याने लयास गेलेही. अशा पक्षांमध्ये आययुएमएल, केकेपी, सीपीआय. आरईपी, बीकेडी, डीडीपी, एसएचपी,  दूरदर्शी, दलित पँथर, राष्ट्रीय पार्टी, समाजदल, लोकदल, सत्यगार्ग, अभाभनिसं, एबीएचएस, एनएमपी, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा, नॅशनल लोकतांत्रिक, बीबीएम, हिंदुस्थान जनता पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी अशा पक्षांचा समावेश राहिला आहे. मात्र काणत्याही अपक्ष अथवा स्थानिक पक्षांच्या उमेद्वारांच्या हाती नेतृत्त्व आलेले नाही. तरीदेखील अपक्ष उमेद्वारांची शृंखला अखंड आहे. किंबहुना शृंखला आणखी विणली जात असल्याने वाढतच आहे. म्हणजेच अपक्ष उमेद्वार वाढतच आहेत.

तृप्ती कानडे - शुक्ल

Friday, April 12, 2019

1957 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक व मालेगाव मतदारसंघांचे नेतृत्त्व बदलले

सन 1957 ची दुसरी लोकसभा निवडणूक म्हणजे नाशिक आणि मालेगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाची एकप्रकारे पिछाडीच ठरली. देशभरात जवाहरलाल नेहरुंचे निर्विवाद नेतृत्त्व असताना मात्र नाशिक मतदारसंघात शेड्युल कास्ट फेडरेशन आणि मालेगाव मतदारसंघात प्रजा सोशल पक्ष यांचे नेतृत्त्व होते. अनुसुचित जमातींचे नेतृत्त्व करणारा शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष आणि 1957 लोकसभा निवडणूक यांविषयी विश्लेषण करणारा लेख.


दुसर्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले, मात्र नाशिक व मालेगाव लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व पाहायला मिळाले नाही. 1957 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 494 जागांपैकी 490 जागांवर उमेद्वार उभे केले आणि 371 जागांवर विजय मिळविला. मात्र याचवेळी नाशिक लोकसभा मतदार संघात ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन‘ आणि ‘मालेगाव लोकसभा मतदारसंघात ‘प्रजा सोशालिस्ट पक्ष‘ यांचे वर्चस्व पाहायला मिळाले.
सर्वाधिक वेळा काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व असणार्‍या नाशिक व मालेगाव मतदारसंघांनी 1957 च्या लोकसभा निवडणुकीत वेगळा इतिहास रचला. नाशिक मतदारसंघातून भावराव गायकवाड यांनी ‘शेडयूल्ड कास्ट फेडरेशन‘ या पक्षाची उमेद्वारी केली आणि 48.44 टक्के मतांनी विजय मिळविला. तर, मालेगाव मतदार संघातून यादव नारायण जाधव यांनी ‘प्रजा सोशलिस्ट पक्ष‘ (पीएसपी) ची उमेद्वारी केली आणि 58.45 टक्के बहुमताने विजय मिळविला. आजपर्यंतच्या इतिहासात नाशिक आणि मालेगाव मतदारसंघाने दोन नव्या पक्षांचे नेतृत्त्व अनुभवले.
सन 1957 च्या दुसर्‍या लोकसभा निवडणूक काळात देशभरात भाषावार प्रांत रचनेनुसार बर्‍याच राज्यांची निर्मिती झाली. भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाल्यानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. मात्र स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती अद्याप झालेली नसल्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी काहीशी वेगळीच होती. मुंबई राज्यात समाविष्ट 58 लोकसभा मतदार संघात ‘नाशिक लोकसभा मतदार संघ‘ आणि ‘मालेगाव लोकसभा मतदार संघ‘ यांचा समावेश होता. कदाचित याच कारणामुळे मुंबई राज्यातील नाशिक व मालेगाव मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व तुलनेने कमी राहिले.

प्रजा समाजवादी पक्ष

19 जानेवारी ते 1 मार्च दरम्यान या निवडणुका पार पडल्या. काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून आचार्य कृपलानी यांनी केएमपीपी अर्थात किसान मजदूर पार्टी स्थापन केली. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पं. जवाहरलाल नेहरु यांचे नेतृत्त्व निर्विवाद होते. यावेळी विरोधी पक्ष वेगवेगळ्या गटात विगभागला गेला होता. 1952 च्या निवडणुकीनंतर आचार्य जे. बी. कृपलानी यांची किसान मजदूर प्रजा पार्टी (के एमपीपी) आणि जयप्रकाश लोहिया यांची सोशालिस्ट पार्टी यांचे विलीनिकरण झाले. दोन पक्ष एकत्र येत नव्या ‘प्रजा समाजवादी पक्षा‘ची स्थापना करण्यात आली. त्याची परिणीती म्हणजे 1957 च्या लोकसभा निवडणुकीत आचार्य जे. बी. कृपलानी हे बिहारमधील सीतामढी मतदार संघातून निवडूप आले. असेच पडसाद 1957 मध्ये मालेगाव मतदार संघातही उमटून पडले.
प्रजा समाजवादी पक्षाने या निवडणुकीत 189 मतदारसंघात उमेद्वार उभे केले.  त्यापैकी 19 जागांवर त्यांचे उमेद्वार निवडून आले. त्यापैकीच एक आपला मालेगाव मतदार संघ. मालेगाव मतदार संघात प्रजा समाजवादी पक्षाचे यादव नारायण जाधव 58.45 टक्के मतांनी विजयी ठरले.

शेड्युल कास्ट फेडरेशन

सामाजिक प्रगती साधणारी राजकीय शक्ती म्हणजे ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन‘ अशी या पक्षाची ओळख. सर्व अनुसुचित जातींनी एकत्रित येत 17 जुलै 1942 रोजी ‘शेड्युल कास्ट फेडरेशन‘ या पक्षाची निर्मिती करीत देशात वर्चस्व असणार्‍या काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षांसमोर एक तिसरी शक्ती निर्माण केली. या पक्षाच्या निर्मितीमागे आपल्या मुक्तीचे दार स्वत: उघडणे अशी भावना होती. काँग्रेस पक्ष म्हणजे समुद्र आहे तर, अनुसुचित जाती एक थेंब स्वरुप आहे. अशात अनुसुचित जातींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कोणतीही पदे मिळणार नाहीत आणि राजकीय शक्ती निर्माण होणार नाही; तेव्हा स्वतंत्र शक्ती निर्माण करावी या भावनेने या पक्षाची निर्मिती करण्यात आली होती.
1952 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन ने 215 उमेद्वार उभे केले. त्यापैकी 12 जागांवर विजय प्राप्त केला. 1942 ते 56 काळात या पक्षाने भारतीय राजकारणावर प्रभाव टाकला. मात्र शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी अशी इच्छा व्यक्त केली की, 1957 च्या निवडणुकीत शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाचे नामांतर राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष असे करावे. नव्याने स्थापन होणारा हा पक्ष कोणत्याही जातीचे नेतृत्त्व करणार नाही, तर एका स्वतंत्र विचारधारेचा पक्ष म्हणून ओळख निर्माण करेल. मात्र यादरम्यान आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले. अशातच 1957 च्या लोकसभा निवडणुकांत पक्षाचे नामांतर न करता शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाने आपले उमेद्वार उभे केले. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 6 आणि इतरत्र 2 अशा एकूण 8 जागांवर विजय मिळविला. त्यापैकीच एक म्हणजे नाशिक लोकसभा मतदार संघातून 48.44 टक्के मतांनी विजयी ठरलेले भावराव गायकवाड. भावराव गायकवाड यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक निवडणूक लढविली. आणि देशात काँग्रेसचे वर्चस्व असताना शेड्यूल कास्ट फेडरेशनची उमेद्वारी स्विकारत विजयही मिळविला.

तृप्ती कानडे - शुक्ल

Thursday, April 11, 2019

सर्वाधिक निवडणुका जिंकणारा अवलिया : कहांडोळे
मालेगाव मतदार संघाचा इतिहास देतो साक्ष

जिल्ह्यातील मालेगाव अथवा दिंडोरी मतदार संघ आणि नाशिक मतदार संघातून आजतागायत अनेक उमेद्वारांनी आपापली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आजपर्यंतच्या इतिहासात अनेकांनी आपली छाप पाडली आणि राजकारणातील आपापल्या स्वतंत्र हातोटीसाठी नावलौकिकही मिळविला आहे. त्यापैकीच एक म्हणजे झेड. एम. कहांडोळे अर्थात झामरु मंगळु कहांडोळे. या अवलियाने सर्वाधिक निवडणुका लढवून बहुमताने जिंकण्याचा बहुमान मिळविला. मालेगाव मतदार संघाचा इतिहास कहांडोळे यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो.

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघापैकी कहांडोळे यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक काळ राजकीय वर्तुळात घालविला. कहांडोळे यांनी सन 1967 पासून ते 1999 पर्यंतचा काळ राजकीय क्षेत्रात घालविला. या काळात त्यांनी 8 वेळा उमेद्वारी स्विकारुन तब्बल 5 वेळा विजय मिळविलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक निवडणुका जिंकणारा आणि सलग खासदार राहिलेला नेता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि विजयही मिळविला.
कहांडोळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे 32 वर्षांचा राजकीय काळ गाजवत असताना भारतीय राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. सुरुवातीपासून मालेगाव (अनु.जमाती) मतदार संघातून भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेद्वारी मिळवत त्यांनी निवडणुका लढविल्या. याचा त्यांना फायदाच झाला.
झामरु मंगळु कहांडोळे यांनी राजकारणात पदार्पण केल्यापासून 1967, 1971, 1977, 1980, 1984, 1991, 1996, 1998 अशा सर्व लोकसभा निवडणुका लढविल्या. पैकी 1977,1984 आणि 1996 या तिनच निवडणुकांत पराभव पाहिला. अन्यथा विजयच अनुभवला.

दणदणीत पराभवानंतरही विजय
 झेड. एम. कहांडोळे यांनी विविध निवडुकांमध्ये विविध प्रकारे उमेद्वारी करीत प्रसंगी पराभवही पचविले आहेत. त्यांच्या ठसठशीत पराभव सांगणारी लोकसभा निवडणूक म्हणजे सन 1984 ची. यावेळी कहांडोळे यांना 2.9 टक्के मतांवर पराभव स्विकारावा लागला. त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात कमी मते पडलेली ही लोकसभा निवडणूक ठरली. यावेळी झामरु कहांडोळे यांची राजकीय लोकप्रियता ढासाळल्याचे दिसते. राजकीय लोकप्रियता फार घटली परंतु विजयाचा ध्वज यावेळीही शेवटाला गेलेला नाही. या निवडणुकीत त्यांचे स्थान तृतीय क्रमांकावर राहिले.
1984 च्या निवडणुकीत सिताराम भोये आणि हरीभाऊ महाले यांच्यात चुरशीची लढत झाली. भोये 52.68 टक्के मतांनी विजयी ठरले तर 42. 72 टक्के मतांनी हरीभाऊ महाले पराभूत झाले. तर अवघ्या 2.09 मतांवर कहांडोळे तृतीय क्रमांकावर राहिले. सर्वात मोठा पराभव पचवून लागलीच पुढील निवडणुकांच्या तयारीस लागले. आपली राजकीय समीकरणे आखत झामरु कहांडोळे यांनी लगेचच 1991 च्या पुढील लोकसभा निवडणुकीत 48.07 टक्के मतांनी दणदणीत विजयही पटकावला.

सर्वाधिक वेळा खासदार राहिलेला नेता
सर्वाधिक निवडणुका लढविणार्‍या उमेद्वारांमध्ये तत्कालीन मालेगाव मतदारसंघातील उमेद्वार हरीभाऊ महाले आणि झामरु कहांडोळे यांचा नंबर लागतो. हरीभाऊंनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूका लढविणार्‍या उमेदवारांमद्ये सर्वाधिक वेळा निवडणूका लढविणारा उमेद्वार म्हणून ओळख प्राप्त केली. मात्र कहांडोळे यांनी सर्वाधिक निवडणुका लढविण्याबरोबरच त्या जिंकण्याचा बहुमानही मिळविला. जिल्ह्यातील ‘सर्वाधिक वेळा खासदारकी मिळविलेला नेता‘ अशी त्यांची ओळख.

सलग दोनदा खासदार राहिलेला नेता
जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदार संघात ‘दोन वेळा खासदार निवडून येत नाही‘ असे स्टेटमेंट सर्वसामान्यपणे ऐकायला मिळते. मात्र त्याबाबत वास्तव काही वेगळेच आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात सलग दोनदा निवडून आलेला खासदार म्हणजे भानुदास कवडे. तर, मालेगाव लोकसभा मतदारसंघात सलग निवडून आलेल्या खासदारांची संख्या 3 इतकी आहे. सन 1967 व 1971 मध्ये ‘सलग दोनदा‘ निवडून आले. त्यानंतर सन 1991, 1998 आणि 1980 मध्ये देखील ते खासदार राहिले.

तृप्ती कानडे - शुक्ल