रेकॉर्डब्रेक लोकसभा निवडणुका लढविणारा नायक : हरीभाऊ महाले
नाशिक जिल्ह्यातील अनेक चेहर्यांनी लोकसभा निवडणूक गाजविली आहे. त्यात विविध प्रकारे उमेदवारी करीत प्रसंगी पराभवही पचविले आहेत. त्यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो तत्कालीन मालेगाव (अनुसूचित जमाती) मतदारसंघातील उमेदवार हरिभाऊ महाले यांचा. हरिभाऊ महाले यांनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुका लढविणार्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजेच तब्बल 9 वेळा निवडणुका लढविणारा उमेदवार म्हणून ओळख प्राप्त केली आहे. त्याखालोखाल झांगरू मंगळू कहांडोळे यांनी 8 वेळा उमेदवारी मिळवीत निवडणूक लढविण्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
काही ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेच्या निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा निवडणूकांचा आवाका मोठा असतो. त्यामुळे लोकसभा निवडणूक अधिकाधिक वेळा लढविणे ही बाब राजकीय वर्तुळातील व्यक्ती, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरते. लोकसभा निवडणुकीचा आवाका पाहता खर्च, धावपळ, मनुष्यबळ, पाठबळ, मनोबल, सकारात्मकता आदींचे गाठोडेच सोबत बांधलेले असते. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणातून भले भले परत फिरलेले राजकीय वर्तुळाने पाहिले आहे, अनुभवले आहे; मात्र अशाही परिस्थितीवर मात करीत हरिभाऊ महाले यांनी जिल्ह्यात सर्वाधिक वेळा निवडणूक लढविण्याचा पराक्रम केला तो त्यांच्या संपर्काच्या बळावर.
तत्कालीन असलेला मालेगाव (अनु. जमाती) मतदारसंघातून हरिभाऊ शंकर महाले यांनी निवडणूक लढविली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा निवडणूक लढवीत असताना प्रसंगी हारही पत्करताना हरिभाऊ शंकर महाले आपल्या राजकीय काळात बंडखोरीचे राजकारणापासून दूरच राहिले. त्यांनी पक्षांतर न करता ‘जनता दल‘ या राजकीय पक्षाची उमेदवारी कायम ठेवली.
हरिभाऊ शंकर महाले यांनी 1977, 1980, 1984, 1989, 1991, 1996, 1999, 2004 या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकींना उमेदवारी स्वीकारली आणि लढविलीही. तीन वेळा निवडणुक लढविल्यानंतर हरी शंकर महाले यांना 3 वेळा विजयी ठरले आणि त्यांना लोकसभेत खासदारकी मिळाली. त्यापैकी एकदाही महाले सलग निवडून आलेले नाहीत. हरी महाले यांनी सर्वप्रथम 1977 ची निवडणूक लढविली तेव्हा त्यांनी 51.91 टक्के मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. त्यांनी लढविलेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना मिळालेले हे सर्वाधिक मतदान होते. त्यानंतर 1989 च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमत:च लोकसभा निवडणूक लढविणार्या हरिश्चंद्र चव्हाण यांचा पराभव करून महाले यांनी 50.96 टक्के मतांनी विजय मिळविला. सन 1998 मध्ये महाले यांना धक्का बसावा इतके कमी मतदान झाले. अवघे 13.07 टक्के मत मिळाल्याने महाले यांना पराभव पत्करावा लागला. इतके कमी मतदान झाल्यानंतरही पराभवाची तमा न बाळगता पुन्हा 1999 मध्ये निवडणूक लढविण्यास तयार राहिलेला निधड्या छातीचा नायक म्हणजे हरिभाऊ महाले. या नायकाने 1999 मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक जिंकली. 29.32 टक्के मतांनी विजय मिळविला.
हरिभाऊ महाले आणि कहांडोळे यांची चुरस
मालेगाव मतदारसंघातील निवडणुकीचा इतिहास बारकाईने पाहता हरिभाऊ शंकर महाले आणि झामरू कहांडोळे यांची बर्याचदा टक्करची लढाई झाल्याचे दिसते. सन 1977 मध्ये कहांडोळे यांचा पराभव करीत महाले 51.91 टक्के मतांनी विजयी ठरले. तर, 1980 मध्ये कहांडोळे यांनी 49.80 टक्के मते मिळवित महालेंचा पराभव केला. 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सीताराम भोये हे प्रतिस्पर्धी नव्याने दाखल झाले. या निवडणुकीमध्ये सीताराम भोये 52.68 टक्के मतांनी विजयी ठरले व महाले यांनी कहांडोळे यांना हार पत्करावी लागली. असे असले तरी महाले-कहांडोळे चुरस कायम राहिली. यावेळी महाले यांनी 42.72 टक्के मते मिळवीत द्वितीय आणि कहांडोळे यांनी अवघे 2.09 टक्के मते मिळवीत तृतीय क्रमांकांवर राहिले. सन 1996 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सन 1984 मध्ये झालेल्या निवडणुकीची सावली पडल्याचे दिसते. यावेळी कचरूभाऊ राऊत यांनी 34.59 टक्के मते मिळवीत विजय मिळविला आणि महाले व कहांडोळे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. सन 1998 मध्ये पुन्हा महाले-कहांडोळे टक्कर पाहायला मिळाली. यावेळी झेड. एम. कहांडोळे यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 42.88 टक्के मतांनी कहांडोळे विजयी ठरले. तर 13.07 टक्के मतांवर महाले यांना पराभव पत्करावा लागला. सन 1989 ची निवडणूक यास अपवाद राहिली. कहांडोळी यांना उमेद्वारी मिळाली नाही; मात्र याच वेळी हरिश्चंद्र चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणुकीस पहिल्यांदाच उभे राहिले. यावेळी चव्हाण यांनी महाले यांच्यात चुरस होवून महाले 50.96 टक्के मतांनी विजयी ठरले, तर चव्हाण यांना 47.92 टक्के मते मिळाल्याने हार पत्करावी लागली.
सन 2004 नंतर बदलले नेतृत्व
सन 1989 आणि 2004 च्या निवडणुकीत साम्य दिसते. या दोन्ही निवडणुकींमध्ये झेड. एम. कहांडोळे यांना उमेदवारी मिळालेली नाही. तेव्हा दोन्ही वेळा हरिभाऊ महाले-हरिश्चंद्र चव्हाण टक्कर पाहायला मिळाली. मात्र पहिल्या वेळी महाले विजयी ठरले तर, दुसर्या वेळी भाजपकडून उभे राहिलेले चव्हाण 36.94 टक्के मतांनी विजयी ठरले. यावेळी निवडून आलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी पुढे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याची हायट्रिक केली. सन 2004 मध्ये असलेल्या मालेगाव मतदारसंघातून व 2009, 2014 मध्ये असलेल्या दिंडोरी मतदारसंघातून हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपची उमेदवारी मिळवीत खासदारकी मिळविली.
तृप्ती कानडे - शुक्ल


No comments:
Post a Comment