1957 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक व मालेगाव मतदारसंघांचे नेतृत्त्व बदलले
दुसर्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले, मात्र नाशिक व मालेगाव लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व पाहायला मिळाले नाही. 1957 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 494 जागांपैकी 490 जागांवर उमेद्वार उभे केले आणि 371 जागांवर विजय मिळविला. मात्र याचवेळी नाशिक लोकसभा मतदार संघात ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन‘ आणि ‘मालेगाव लोकसभा मतदारसंघात ‘प्रजा सोशालिस्ट पक्ष‘ यांचे वर्चस्व पाहायला मिळाले.
सर्वाधिक वेळा काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व असणार्या नाशिक व मालेगाव मतदारसंघांनी 1957 च्या लोकसभा निवडणुकीत वेगळा इतिहास रचला. नाशिक मतदारसंघातून भावराव गायकवाड यांनी ‘शेडयूल्ड कास्ट फेडरेशन‘ या पक्षाची उमेद्वारी केली आणि 48.44 टक्के मतांनी विजय मिळविला. तर, मालेगाव मतदार संघातून यादव नारायण जाधव यांनी ‘प्रजा सोशलिस्ट पक्ष‘ (पीएसपी) ची उमेद्वारी केली आणि 58.45 टक्के बहुमताने विजय मिळविला. आजपर्यंतच्या इतिहासात नाशिक आणि मालेगाव मतदारसंघाने दोन नव्या पक्षांचे नेतृत्त्व अनुभवले.
सन 1957 च्या दुसर्या लोकसभा निवडणूक काळात देशभरात भाषावार प्रांत रचनेनुसार बर्याच राज्यांची निर्मिती झाली. भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाल्यानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. मात्र स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती अद्याप झालेली नसल्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी काहीशी वेगळीच होती. मुंबई राज्यात समाविष्ट 58 लोकसभा मतदार संघात ‘नाशिक लोकसभा मतदार संघ‘ आणि ‘मालेगाव लोकसभा मतदार संघ‘ यांचा समावेश होता. कदाचित याच कारणामुळे मुंबई राज्यातील नाशिक व मालेगाव मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व तुलनेने कमी राहिले.
प्रजा समाजवादी पक्ष
19 जानेवारी ते 1 मार्च दरम्यान या निवडणुका पार पडल्या. काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून आचार्य कृपलानी यांनी केएमपीपी अर्थात किसान मजदूर पार्टी स्थापन केली. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पं. जवाहरलाल नेहरु यांचे नेतृत्त्व निर्विवाद होते. यावेळी विरोधी पक्ष वेगवेगळ्या गटात विगभागला गेला होता. 1952 च्या निवडणुकीनंतर आचार्य जे. बी. कृपलानी यांची किसान मजदूर प्रजा पार्टी (के एमपीपी) आणि जयप्रकाश लोहिया यांची सोशालिस्ट पार्टी यांचे विलीनिकरण झाले. दोन पक्ष एकत्र येत नव्या ‘प्रजा समाजवादी पक्षा‘ची स्थापना करण्यात आली. त्याची परिणीती म्हणजे 1957 च्या लोकसभा निवडणुकीत आचार्य जे. बी. कृपलानी हे बिहारमधील सीतामढी मतदार संघातून निवडूप आले. असेच पडसाद 1957 मध्ये मालेगाव मतदार संघातही उमटून पडले.
प्रजा समाजवादी पक्षाने या निवडणुकीत 189 मतदारसंघात उमेद्वार उभे केले. त्यापैकी 19 जागांवर त्यांचे उमेद्वार निवडून आले. त्यापैकीच एक आपला मालेगाव मतदार संघ. मालेगाव मतदार संघात प्रजा समाजवादी पक्षाचे यादव नारायण जाधव 58.45 टक्के मतांनी विजयी ठरले.
शेड्युल कास्ट फेडरेशन
सामाजिक प्रगती साधणारी राजकीय शक्ती म्हणजे ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन‘ अशी या पक्षाची ओळख. सर्व अनुसुचित जातींनी एकत्रित येत 17 जुलै 1942 रोजी ‘शेड्युल कास्ट फेडरेशन‘ या पक्षाची निर्मिती करीत देशात वर्चस्व असणार्या काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षांसमोर एक तिसरी शक्ती निर्माण केली. या पक्षाच्या निर्मितीमागे आपल्या मुक्तीचे दार स्वत: उघडणे अशी भावना होती. काँग्रेस पक्ष म्हणजे समुद्र आहे तर, अनुसुचित जाती एक थेंब स्वरुप आहे. अशात अनुसुचित जातींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कोणतीही पदे मिळणार नाहीत आणि राजकीय शक्ती निर्माण होणार नाही; तेव्हा स्वतंत्र शक्ती निर्माण करावी या भावनेने या पक्षाची निर्मिती करण्यात आली होती.
1952 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन ने 215 उमेद्वार उभे केले. त्यापैकी 12 जागांवर विजय प्राप्त केला. 1942 ते 56 काळात या पक्षाने भारतीय राजकारणावर प्रभाव टाकला. मात्र शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी इच्छा व्यक्त केली की, 1957 च्या निवडणुकीत शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाचे नामांतर राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष असे करावे. नव्याने स्थापन होणारा हा पक्ष कोणत्याही जातीचे नेतृत्त्व करणार नाही, तर एका स्वतंत्र विचारधारेचा पक्ष म्हणून ओळख निर्माण करेल. मात्र यादरम्यान आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले. अशातच 1957 च्या लोकसभा निवडणुकांत पक्षाचे नामांतर न करता शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाने आपले उमेद्वार उभे केले. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 6 आणि इतरत्र 2 अशा एकूण 8 जागांवर विजय मिळविला. त्यापैकीच एक म्हणजे नाशिक लोकसभा मतदार संघातून 48.44 टक्के मतांनी विजयी ठरलेले भावराव गायकवाड. भावराव गायकवाड यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक निवडणूक लढविली. आणि देशात काँग्रेसचे वर्चस्व असताना शेड्यूल कास्ट फेडरेशनची उमेद्वारी स्विकारत विजयही मिळविला.
तृप्ती कानडे - शुक्ल

No comments:
Post a Comment