Monday, April 8, 2019

जिल्ह्यातील मतदार संघांचा हा प्रवास...


स्वतंत्र भारतात 1951 साली पहिली निवडणूक पार पडली. सुरुवातीस मुंबई राज्यात समाविष्ट झालेला ‘नाशिक मध्य मतदार संघ‘ आणि त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर ते आजमितीस झालेल्या सर्व सार्वत्रित निवडणूकांमध्ये जिल्ह्यातील मतदार संघांचा हा प्रवास...

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1951 साली स्वतंत्र आणि लोकशाही राज्यघटनेचा स्विकार केलेल्या भारतात पहिलीच सामान्य निवडणूक पार पडली. यावेळी मुंबई राज्यात एकूण 37 मतदारसंघांचा समावेश होता. त्यापैकी मुंबई राज्यात ‘नाशिक मध्य लोकसभा मतदार संघा‘चा समावेश होता.
देशात भाषिक प्रांतरचनेचे वारे वाहत असतानाच 1 नोव्हेंबर 1956 साली केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून आणि बेळगाव-कारवार वगळून विशाल द्विभाषिक स्थापले; परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. 1957 साली झालेल्या सामान्य निवडणूकीमध्ये मुंबई राज्यात एकूण 58 मतदारसंघांचा समावेश होता. पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दुसर्‍या लोकसभा निवडणुकीत 21 लोकसभा मतदार संघांचा नव्याने समावेश करण्यात आला.
1957 मध्ये पार पडलेल्या दुसर्‍या सामान्य निवडणुकीमध्ये मुंबई राज्यात समाविष्ट असलेल्या ‘नाशिक मध्य मतदार संघा‘चे नामांतर ‘नाशिक मतदार संघ‘ असे करण्यात आले. याचवेळी मुंबई राज्यात ‘मालेगाव लोकसभा मतदार संघा‘चा नव्याने समावेश करण्यात आला.
काँग्रेस पक्षाला 1962 ला होणार्‍या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे काँग्रेसचे नेतृत्त्व संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधी यांनी नेहरुंचे मन वळवले. गुजरातचे ’व्याज’ म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. नेहरुंना हवे असलेले राज्याचे ’मुंबई’ नाव वगळून समितीने ’महाराष्ट्र’ असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगार दिनी म्हणजे 1 मे रोजी करण्यात आली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 1962 साली पहिलीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्यात 44 मतदार संघांचा समावेश होता. सन 1967, 1971 आणि 1977 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात 45 मतदार संघ होते.
दुसर्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई राज्यात ‘नाशिक मध्य‘ आणि ‘मालेगाव मतदार संघां‘चा समावेश राहिला. महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यानंतर 1962 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यात ‘नाशिक मतदार संघ‘ आणि ‘मालेगाव मतदार संघ‘ या हे मतदार संघ समाविष्ट होते. सन 1967 मध्ये मालेगाव मतदार संघात अनुसूचित जमातींना सामावून घेण्यात आले. त्यानुसार 1967 पासून ते सन 2004 दरम्यान पार पडलेल्या सर्व सार्वत्रिक निवडणूकांमध्ये महाराष्ट्र राज्यात ‘नाशिक मध्य मतदार संघ‘ आणि ‘मालेगाव अनुसूचित जमाती मतदार संघ‘ यांचा समावेश होता.
सन 2009 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मालेगाव मतदार संघाचे नामांतर दिंडोरी अनुसूचित जमाती मतदार संघ असे करण्यात आले. पूर्वीच्या ‘मालेगाव लोकसभा मतदारसंघा‘त हा पश्चिम भारतीय राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक होता. सन 2009 पासून मालेगाव (मध्य), मालेगाव (बाह्य) आणि बागलाण (अनुसूचित जमाती) यांचा समावेश ‘धुळे लोकसभा मतदारसंघा‘त करण्यात आला. तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात पेठ-दिंडोरी, सुरगाणा-कळवण, निफाड, नांदगाव, येवला, चांदवड-देवळा हे विधानसभा मतदार संघ ठेवण्यात आले.
आताच्या नाशिक लोकसभा मतदार संघात सिन्नर, नाशिक (पूर्व), नाशिक (मध्य), नाशिक (पश्चिम), देवळाली (एससी) आणि इगतपुरी (एसटी) या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.

तृप्ती कानडे - शुक्ल

No comments:

Post a Comment